प्रत्येक माणूस अगदी आतल्या तळमनात अत्यंत एकटा असतो. तळमनाच्या या पापुद्रयापर्यंत डूब घेणं प्रत्येकजण सहसा टाळत असतो. कारण या एकटेपणाच्या सत्याची जाणीव अत्यंत भयप्रद असते. या सत्याला सामोरं जाणं टाळणं, एकांत टाळणं, सतत इतरांमध्ये राहणं आणि नाईलाजानं आलेल्या एकांतात मन टीव्ही, मोबाइल यांसारख्या कुठल्यातरी साधनांत गुंतवणं असा काही ना काही ‘एस्केप रूट’ सगळेचजण अंगीकारत असतात. आता तर ‘इंटरनेट’, ‘सोशल मीडिया’ सारखी बहिर्मुखतेची अनंत साधनं सहज उपलब्ध झाल्यामुळं या आधुनिक जगात स्वतःशी ‘एन्काऊंटर’ टाळणं आता अधिक सोपं झालेलं आहे. आणि कुठल्याही गोष्टीला आपण जितकं टाळत राहू तितकीच ती एखाद्या गळूसारखी आतल्या आत वाढत जाते हे पण एक नैसर्गिक सत्य असल्यामुळे प्रत्येकाचा हा आतला एकटेपणा सतत थोडा थोडा वाढतच जात असतो.
पण तळमनातल्या या एकटेपणाच्या कोशातच आपलं खरं व्यक्तित्व, आपलं मुळ अस्तित्व दडलेलं असतं. आपलं सध्याचं व्यक्तिमत्त्व हे संस्कार, अनुभव, भीती यांच्या ‘कंडिशनिंग’ ची वर्षानुवर्षाची अनेक पुटं चढत जाऊन आपल्या मूळ व्यक्तिमत्वापेक्षा बरचसं वेगळं झालेलं असतं. आणि असं परकं अस्तित्वच आपण स्वतःचं म्हणुन समजून जगत असतो.
मनातल्या या ‘एकल्या’ अस्तित्वाला भिऊन त्याच्यापासून दूर पळण्यापेक्षा सरळ जाऊन त्याला भीडणं, त्याच्याशी संवाद साधणं हा स्वतःला मुळापासून सुदृढ करणारा, स्वत:च्या मुळ व्यक्तित्वाशी जोडणारा, एकटेपणाला एकात्मतेत परिवर्तीत करणारा असा खरा ‘उपचार’ आहे.
एकांत आणि एकटेपणा यांत मूलभूत फरक आहे. एकांतानं माणसाचं आत्मबळ वाढतं आणि एकटेपणानं उलट हे प्रकर्षानं कमी होत असतं. आत्मभान जागृत ठेवून स्वत:चंच त्रयस्थ निरीक्षण करीत स्वतःशीच केलेला एकाग्र संवाद हा खरा सशक्त आत्मसंवाद असतो.
आपण इतर कोणाशीच बोलत नसतो, अथवा कुठलंच कार्यालयीन स्वरूपाचं वा इतर काही काम करत नसतो, तेव्हा आपण सतत स्वतःशीच तर बोलत असतो असं आपल्याला वाटत असतं. पण अशा मधल्या मधल्या रिकाम्या काळात आपण करत असतो तो क्रिया-प्रतिक्रियात्मक विचार असतो, स्वत:शी संवाद नसतो. आणि असा विचार तर आपण अगदी सतत दिनचर्येतले सगळे विधी – प्रात:र्विधी आटोपताना ‘घरी-दारी, शय्येवरी, रतीसुखाच्या अवसरी’ असा करत असतो. मनात उठणाऱ्या विविध वृत्ती व आंदोलनांनी प्रेरित असा क्रिया- प्रतिक्रियात्मक विचार असतो. एखाद्या वेठबिगार गुलामाला राबवावं तसं आपलं मन आपल्या डोक्याला सतत त्याच्या मर्जीप्रमाणे दिवसभर वेगवेगळ्या विचारात राबवत असतं.
पूर्णपणे ‘निर्विचार’ असं डोकं किंवा पूर्णपणे ‘भावनारहित’ असं मन आपलं कधीच नसतं. अशी स्थिती जेव्हा-केव्हा अपवादानी क्षण-दोन क्षणांकरता साधली जाते, तेव्हा तर तो आत्मसंवादाच्याही पलीकडचा असा विश्वशक्तीशी संपर्क संवाद आपल्यात घडत असतो.
आपण एका दिवसात इतरांशी करत असलेल्या वेगवेगळ्या संवादात आपली एकाग्रतेची पातळी वेगवेगळी असते. उदाहरणार्थ, आपण एखादं भाषण देत समुदायाशी संवाद साधत असू तेव्हा एकाग्रतेची पातळी महत्तम असते. एखाद्या शिक्षक किंवा प्राध्यापकाची वर्गात शिकवताना; छोट्या समुदाया-सोबतच्या संवादाची एकाग्रतेची पातळी त्यापेक्षा थोडी खालची असते. ऑफिसमधली महत्त्वाची मीटिंग, हाताखालच्या लोकांना देत असलेले ‘ब्रीफिंग’ या सगळ्यांत एकाग्रतेची पातळी आणखी उतरत्या भाजणीची असते. मित्रांशी शिळोप्याच्या गप्पा किंवा जेवताना कुटुंबीयांशी चर्चा यात ती अजूनच अधिक कमी होते. आणि या सगळ्यांपेक्षा दिवसभर डोक्यात चालत असलेल्या भरकटत्या क्रिया- प्रतिक्रियात्मक विचारांनी आपण स्वतःशी साधत असलेल्या ‘सो कॉल्ड’ संवादांची पातळी तर अगदी न्यूनतम अशी असते.
आपल्या आयुष्यात आपल्याला सगळ्यात जास्त जवळचा आणि महत्त्वाचा माणूस म्हणजे आपण स्वतः असतो आणि आपली त्याच्याशीच संवादाच्या एकाग्रतेची पातळी अशी सगळ्यात न्यूनतम असते, हा एक मोठा ‘पॅराडॉक्स’ आहे आणि आपण हे असं करतो आहोत, हे आपल्याला कधीच लक्षातही येत नसतं. हे अजून मोठं दुर्दैव आहे.
— आशुतोष शेवाळकर
(पूर्वप्रसिद्धी: सगुण-निर्गुण: महाराष्ट्र टाइम्स – ११ जानेवारी २०१७)
