Skip to content

ग्रीष्मझळा…

रातकिड्यांच्या कीर्र आवाजाची रात्र कधी अनुभवली आहे का? वणी-चंद्रपूर भागात गावाच्या थोडंही बाहेर पडलं की उन्हाळ्याची कडक दुपार पण अशा सन्नाट्याची असते. उन्हाच्या लाहीलाहीमुळे झाडांवरचे रातकिडे दुपारीच कीर्र… किर्र… असा आर्त चित्कार काढायला सुरुवात करतात. पण तरीही हे निरोगी ऊन असतं. विषारी ऊन शहरात असतं. नागपूरातल्या महाल, इतवारी भागातल्या जुन्या २-३ मजली इमारतींमधल्या अरुंद बोळातून भरदुपारी अर्धा किलोमीटर जरी चाललात, तरी तुम्हाला ऊन लागेल ही खात्री असते. दोन्ही बाजूंच्या उंच गरम भिंतीमुळे ही अरुंद बोळ तापलेल्या भट्टीसारखी झालेली असते. उलट तेच शहरापासून पाच किलोमीटर दूरवरच्या शेतात तुम्ही दुपारी किलोमीटरभर पायी चाललात तरी तुम्हाला ऊन लागत नाही. असं उन्हात फिरल्यावर आंब्याच्या झाडाखाली खाट टाकून पडून राहिलं तरी घामेजल्या शरीरावरून वाहणाऱ्या गरम वाऱ्यांनीसुद्धा आपल्या शरीराच्या आत ‘कूलर’ लावला असल्यासारखं थंड वाटत असतं.
शहरांत माणसांची मनं संपली जातात आणि शरीर नाजूक होतात. लहान गावात माणसाची शरीर संपतात; पण मनं नाजूक राखली जातात. मागचं सदर लिहिल्यावर मग तडप लागावी तशी मला वणीच्या उन्हाची तहानंच लागली. या उन्हाळ्यात वणीला जाणं झालंच नव्हतं. जाऊन दोन दिवस राहून आलो. भरदुपारी एक वाजता रेल्वेलाइनपर्यंत एक-दोन किलोमीटरची पायी रपेट मारून आलो. मध्ये एक दोन फोन आलेत. पायातल्या रबराच्या स्लीपर्स आणि मोबाईल फोन दोन्ही चटका लागेल इतके गरम झालेत. चपला पायात घालवेना, मोबाईल कानाला लाववेना; पण शरीराला काही त्रास झाला नाही. निर्जीव वस्तू त्रस्त झाल्यात; पण सजीव शरीर मात्र शांत होतं. एखादी परीक्षा पास झाल्यासारखं वणीचं नागरिकत्व आपण अजून टिकवून ठेवलं असण्याचा आनंद मग मला झाला.
रेल्वेलाइनजवळ बाभळीच्या वनात रातकिड्यांची कीर्र किर्र सुरू होती. माझ्या एका शहरी मैत्रिणीचा दुपारी रातकिड्यांच्या आवाज येऊ शकतो, यावर विश्वासंच बसत नसे. तिला फोनवरून तो आवाज ऐकवला. घरी आल्यावर घामाने निथळत होतो. घशाला कोरड पडली होती. एक एक घोटाचा आस्वाद घेत पाच-सहा ग्लास थंड पाणी पिण्यात मग जी मजा आली ती अवर्णनीय होती. लिटरभर पाणी आपण रिचवतो, तेव्हा लागलेली असते तीच खरी तहान; इतर वेळेस आपण घसा थोडा कोरडा झाला की उगीच थोडं थोडं पाणी पित असतो. असं मग मला वाटायला लागलं.
मग जुने दिवस आठवले. वणीला उन्हाळ्यात संध्याकाळी उशिरा टयुशनवरून सायकलने परत येतानाही घामाच्या धारा लागायच्या. घशाला कोरडं पडलेली असायची. घरी आल्यावर अंगणात खाटा, गाद्या टाकलेल्या असत. त्यांच्यावरची चादरसुद्धा गरम असायची.
बाजूला खुर्चीवर मातीची सुरई असायची आणि त्यात थंड पाणी. त्या सुरईतून ओतून घेऊन ३-४ ग्लास थंड पाणी पिण्याचा तेव्हाचा आनंद मी अजूनही विसरू शकत नाही. मध्यरात्री कधीतरी मग चादरी थंड व्हायच्या. सेकंड शो पाहून आल्यावर या थंड चादरीवर झोपणं ही पण खूप मजा असायची.
वाळ्याचा, मोगऱ्याच्या फुलांचा वास आला की उन्हाळा माझ्या अंगात भिनायला सुरुवात होते. या चाहुलीनीच उन्हाळ्याची ‘उमंग’ माझ्या मनात दाटायला सुरुवात होते. आधी दारं-खिडक्यांना लागणाऱ्या वाळ्याच्या ताट्या, वाळ्याचे पडदे हा म्हणजे उन्हाळ्याचा जाहीरनामा असायचा. त्यांच्यावर पाणी टाकलं की खोलीभर पसरणारा त्याचा शीतल सुवास, पंख्याने पसरणारी त्यांच्यातून येणारी थंड हवा हा सगळा एकूणच शीतल अनुभव असायचा. झिरपणाऱ्या काळ्या माठात वाळ्याची जुडी टाकलेलं थंड पाणी हेही उन्हाळ्यात एखाद्या पेयासारखं आनंद देऊन जातं.
आधीचे कूलरही वेगळेच असायचे. खाली टाकी वर छिद्र असलेली टाकी. तिन्ही बाजूंना वाळ्याच्या ताट्या आणि समोर गोल कापलेला दरवाजा, असा तो असायचा. दरवाजा उघडून त्याच्या आत टेबलफॅन ठेवावा लागे. आत्ताच्या स्वावलंबी ‘डेझर्ट कूलरच्या’ शोधाची ही खरी जननी होती. बाबांना कुठलेतरी ‘अॅरिअर्स’ मिळाल्यावर वणीच्या जत्रेतून आईने चाळीस रुपयांचा असा एक कूलर विकत घेतला होता.
घराच्या भिंतीबाहेर असा गरम उन्हाच्या झळा आणि आत
‘कूलर’चा लडीवाळ थंड वारा. सुख आणि दुःखात अंतर काय ते फक्त एका भिंतीचच असतं. वास्तवाचा चटका लागू नये म्हणून आपण स्वतःभोवती भिंती उभ्या करतो आणि त्याही भेदून आत येणाऱ्या झळांचा सामना करायला, मग सोयीस्कर समजुतींच्या ‘कूलर’चा लाडीवाळ वारा अंगाभोवती वेढून घेतो.
“हर तरफ रज्म की राहों में कड़ी धूप है दोस्त, बस तेरी यादों के साये है पनाहो की तरह” असे म्हणणाऱ्या शायराला तर या भौतिक ‘पनाहो’चीही गरज भासताना दिसत नाही.
‘कन्फ्युशियस’ला कोणी विचारलं, सुख आणि दुःख दोन्ही वेळी कामी येईल असं मला सत्याचं एकच वाक्य सांग. त्याने ते वाक्य सांगितले. ‘हे फार काळ टिकणारं नाही’. केवढं प्रगल्भ वाक्य आहे हे! दुःखात या सत्याने हिम्मत येते आणि सुखात हे सत्य आठवलं की आपले पाय जमिनीवर राहतात.
उन्हाळा आता संपत आला; पण मनातल्या उन्हाळ्याच्या आठवणी नाहीत. पुढचं सदर येईल तेव्हा पहिल्यावहिल्या पावसाने आपण चिंब भिजलेलोही असु कदाचित. पण आपली परवानगी असेल तर पुढचं आणखी एक सदर ग्रीष्मा वर लिहीन; तोपर्यंत उरलेला उन्हाळा तुमच्यासाठी एक सोहळा होऊन येवो, ही शुभकामना!
(पूर्वप्रसिद्धी: सकाळ – 2012: स्तंभ ‘जगता जगता’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *